पावसाळी फ्रेम्स..पुन्हा

पावसाळी आठवणींकरता पाऊस पडावा लागत नाही पण पाऊस पडत असेल तर येणाऱ्या आठवणी थांबवतही नाही.
आज इथे पाऊस पडला, फार नाही सकाळपासून दोन तीन सरी येऊन गेल्या असतील पण त्यामुळे हवेत छान गारवा आहे आणि आकाशात गोळा झालेल्या ढगांमुळे एक परफेक्ट पावसाळी दिवस आहे.
पावसाळी आठवणी म्हणाले खरी पण पाऊस म्हंटलं को नक्की काय आठवत? धो धो पडणाऱ्या सरीवर सरी, विजांचा कडकडाट,सोसाट्याचा वारा, हे सगळं आठवतच पण बॅकग्राऊंड स्कोअर सारखं, सगळ्यात आधी आठवतात त्या वेगवेगळ्या जागा,त्यांच्यात पावसाने होणारे बदल,पाऊस पडून गेल्यावर क्षणात बदलून जाणारं त्या जागेचं रूप,पावसात न्हाउन तरारलेली झाडं, निवलेला वारा, स्वच्छ आभाळ आणि ह्या लोभस निसर्गरूपाने स्वतःमध्ये झिरपणारे चैतन्य!
पावसात आवडती जागा म्हणजे होस्टेलची रूम, तिच्यातून दिसणारा पाऊस.तो पाऊस जितका वेड लावणारा वाटलेला तितकाच सह्याद्रीच्या कडेकपारीत चढताना कोसळणारा पाऊसही आपला वाटलेला!
पण आता खूप ठळकपणे आठवतोय तो भीमाशंकरचा पाऊस.
भीमाशंकरला जाणचं मुळात पावसात झालंय. एकदा निवांतपणे गाडीत बसून जात होतो तर जोराचा पाऊस सुरू झाला, काचेपलीकडेचा पाऊस न भिजता पाहत होते,मागे गाणं सुरू होतं, ये साजिश है बुंदौकी,कोई ख्वाईश है चुपचुपसी..,पुन्हा परत येशील तेंव्हा भिजशीलचं असं वचन घेत गायबलेला पाऊस!
नंतर तिकडे गेले ते शिडीच्या वाटेने चढण्यासाठी.तेंव्हाच्या शिड्या अवघड होत्या आतापेक्षा . आदल्या रात्री पायथ्याच्या गावात मुक्कामाला राहिलेलो,भल्या पहाटे उठून चढायला सुरुवात केली.पहिली चढण सोपी होतीसमोर भीमाशंकर चा अजस्त्र कडा खुणावत होता. चढता चढता पहिल्या शिडीशी पोहोचलो आणि पाऊस कोसळायला सुरुवात झाली,इतका की दोन फुटावरचा माणूस दिसेना.सगळा परिसर धुक्यात वेढलेला, ढगांवरून चालतोय असं वाटायला लावणारा. एकेक निसरडी शिडी अंदाजे चढत होतो ,आधी त्या वाटेने जाऊन आलेले काही लोकं सोबत होते , त्यांनी सांगितलं कि त्या शिड्यांच्या पलीकडची दरी बरीच खोल आहे ,पाऊस नसताना चढलो तर डोळे फिरतात. पण आम्ही चढत होतो तेंव्हा इतकं धुकं होतं की त्याच्या आधारानेचं चढतोय असं वाटत होतं.पाठीवरची सॅक ,अंगावरचं जॅकेट ,कपडे सगळं भिजून चिंब झालेलं. 
शिड्या संपल्यावर सुरु झालेल्या पायवाट चिखलात हरवलेल्या,एक पाय उचलला कि दुसरा सटकतोय असं वाटत होतं , समोरून चालणाऱ्या दोघांनी पाय सटकल्याने चिखलात लोळण घेतली ,ते पाहून पायातले शूज आणि सॉक्स काढून  सॅकला लटकावले आणि चालू लागले . फार हुशारीचा निर्णय नव्हता खरा पण आयत्या वेळी तेच सुचलं ,तेवढीचं निसर्गाशी जवळीक साधतेय असा विचार डोकावला ,रानाची लेकरं रोज असंच अनवाणी चालत असतील त्या वाटांवरून ,आपणही थोडं चालून बघू ,चालत राहिले तस हळूहळू अनवाणी पायांचा विचार मागे पडला..
अजून थोडं चालले तस बाजूची झाडी खूप दाट झाली ,जंगल गडद झालंय ,विचारात हरवले तसा चालायचा वेग मंदावला असावा बहुथा कारण समोर चालणारी माणसं दिसेनाशी झाली आहेत,मागच्या माणसांची अजून चाहूल नाहीय ,रस्ता चुकले आहे का? पण सकाळपासून अविरत पडणाऱ्या पावसात भिजून,चालून,धडपडून, डोंगर चढून कुठलासा आत्मविश्वास जागा झालाय ,मी ह्या जंगलात हरवणार नाही ,हि जागा ओळखीची झालीय ,खरंतर आसपास कुणी नाहीय हेच बरंय ,आजूबाजूला केवढेसारे आवाज आहेत ..पावसाचे,रातकिड्यांचे ,ठाऊक नसलेल्या पक्षांचे ,त्यांत नको मिसळायला माणसांचा आवाज ,न जाणो तो ऐकून इथं मंद सप्तकात सुरु असलेलं संगीत थांबेल.. पायाखाली पानाफुलांचा सडा आहे , कुठलीशी रानफ़ळ आहेत आजूबाजूंच्या झाडांवर ,त्यांचा गोडसर वास सगळीकडे भरून राहिलाय .. 
आता पाऊस जरा विश्रांती घेतोय पण धुक्याची चादर तशीच गडद आहे.,ह्या धुक्यात वेढलेली झाडं अजून गूढ वाटताहेत ,ह्या सगळ्यात एक अदृश्य ओढ जाणवतेय ,असंच चालत राहावं अनंतापर्यंत ,इथलं संगीत ,हि शांतता ,पाऊस ,वारा ,धुकं हे सगळं अनुभवतं .. mystic beauty ह्या शब्दाचा अर्थ इथे कळतोय 
हे सगळं आपलंस आणि ओळखीचं का वाटतंय ,स्वतःला पडलेल्या काही कोड्यांचा उलगडा इथे झाल्यासारखा वाटतोय म्हणून असेल कदाचित ..आवडतं गाणं पुन्हा पुन्हा ऐकावं आणि प्रत्येक वेळी त्याचा नवीन अर्थ कळवा तसं काहीसं घडतंय इथल्या नव्या वळणांवर ,तेच वातावरण परत नव्याने भारून टाकतंय .. 
पण आता झाडं विरळ होतं आहेत ,काही फुटांवरचा डांबरी रस्ता  गावं जवळ आल्याची जाणीव करून देतोय ,सोबतची माणसं माझी वाट पाहत थांबलेली दिसत आहेत ,आता धुकं निवळतंय ,आता माणसात परतायला हवं .. 
मेडिटेशन किंवा काय ते माहित नाही पण आताही ते वातावरण आठवलं की मन पिसासारखं हलकं होऊन तिथं पोहोचतं


मला पाऊस आवडत नाही..

कधी कधी पाऊस ओव्हर hyped वाटतो, ओके वेल, जगण्यासाठी,पिकासाठी पाऊस हवाचं ,हे अगदी बिनशर्त मान्यच! पण मी बोलतेय तो हा पाऊस नाही,तो हा सगळ्यांना,विशेषतः नवकवींना आवडणारा रोमॅंटिक पाऊस!!
एक ऋतू,या पलीकडे का त्याचं कौतुक असावं? पाऊस वेळेवर आला,भरपूर बरसला की पांघरुणात दडी मारून घरी बसावं,फार वाटलंच तर चहा,भजी वगैरे चंगळ करत पावसाच्या गप्पा माराव्यात; पण हे पाऊस येणार म्हणून त्याची वाट पहाणं, उन्हाळ्याच्या शेवटाकडे जरा कुठे आकाशात चुकार ढग डोकावला,थोडं अंधारून आलं,गार वारं वाहू लागलं की पावसाचे वेध लागणं, वळवाची एखादी सर बरसली की  आनंदाने वेडं होणं म्हणजे जरा जास्तचं की!
अर्थात हे खरं की वळवाच्या पावसाआधी दाटलेल्या ढगांनी वेढलेल्या संध्याकाळी मन उगाच कातर होतं, पहिल्या पावसात भिजताना मनाचं छोटं मूल होतं, रात्रभर धोधो कोसळणारा पाऊस ऐकत आतल्या आत काहीतरी सुचत जातं,एका पावसानंतर उगवलेलं कोवळं हिरवं सोनं बघून मोहरायला होतं,आणि पडलेलं कोवळं ऊन अधिकच सुखावू लागतं, कितीही ठरवलं की भिजायचं नाही तरी पाऊस भिजवतोच खरा!
मला पाऊस आवडत नाही हे एखाद्याला सांगणं अवघड पण मला पाऊस आवडतो ,हे सांगणं तितकंच सोप्प..सो हॅप्पी मान्सून..भिजा आणि भिजू द्या :)

पावसाळी फ्रेम्स

गेले २-३ दिवस इथे पाऊस पडत होता . इथली नेहमीची उन्हाळी हवा दूर कुठेतरी पळून जावी अशी गायब झाली. तसा पाऊस नेहमीच आवडीचा विषय राहिला आहे. पण मध्यंतरी जरा दुर्लक्षलेला . पण कालच्या पावसाळी गार हवेने बऱ्याच दिवसांनी पाऊस परत आवडला.

 मला पाऊस आवडतो . कधी पाहायला, कधी भिजायला तर कधी नुसताच आठवायला.  कधी कल्पनेतला पाऊसही आवडतो . आपल्याचं विश्वात फुलवायला .
पाऊस खूप खूप बरसून आणि चिंब भिजवूनही उरला की खरा पाऊस वाटतो . एखादा निवांत दिवस असावा . कोणत्याही अपेक्षा नसलेला . मग आजूबाजूच्या वातावरणाची किंवा कशाचीही चिंता न करता चिंब भिजत राहावं इतकं की पाऊस मनापर्यंत झिरपतोय असं वाटावं . अशा वेळी पाऊस समजतो आणि भिजवतोही , खऱ्या अर्थाने ..

काल पाऊस पाहता पाहता उगीच आठवत होते की मुद्दाम पावसात भिजून किती वर्ष झाली . नक्की आठवलं नाही पण पावसात भिजलेल्या आठवणी मात्र जाग्या झाल्या .आपण पाऊस आठवतो , तेंव्हा खर तर पावसाळी आठवणींच्या फ्रेम्स आठवतो. 
माझ्या आवडत्या पावसाळी फ्रेम्सपैकी एक म्हणजे माझ्या हॉस्टेलच्या रूम मधून दिसणारा पाऊस .. युनिवर्सिटी च्या कॅम्पस मधली हिरवीगार झाडी अजूनच सुंदर वाटत असे पावसात . पाऊस पडून गेल्यावर रस्ता स्वच्छ आणि नितळ दिसे . स्वत:चेच विचार स्वत:ला अधिक स्पष्टपणे जाणवत आहेत असे वाटे .
 किती गंमत असते ,एखादा क्षण आपण जेंव्हा जगत असतो तेव्हा माहितीच नसत की तो इतका आठवला जाईल . आणि अशी जर जाणीव झाली की हाच तो क्षण , जो आपल्याला आठवेल तर आपण तो थोपवण्याचा किंवा बंदिस्त करायचा प्रयत्न करतो. कॉलेज संपण्याच्या शेवटच्या काही दिवसात हे प्रकर्षाने जाणवत .. जिकडेतिकडे फोटोंचे लखलखाट दिसतात . माझेही कॉलेजचे शेवटचे दिवस याला अपवाद नव्हते पण काही केल्या खिडकीतून दिसणारा पाऊस काही एका क्लिक मध्ये पकडता येईना . मग शेवटी फोटो चा नाद सोडला आणि शांतपणे पाऊस थांबेपर्यंत तो पाहत राहिले

शहर

आपलं शहर
खरंतर हे आपलंच शहर असतं,इथले ट्राफिक जॅम,खड्डे ,गर्दी ,छोटे रस्ते,असंख्य वन वे अशा सगळ्या गोष्टीं सहीत! पण या गोष्टी कधीच प्रकर्षाने जाणवल्या नसतात. एकेकाळी अनोळखी असलेल्या या शहरात एन्ट्री केल्यावर पाहता पाहता कधी हे शहर आपलंच होऊन गेलं हे कळलं देखील नसत. इथला पाऊस,इथला हिवाळा ,शॉपिंग करता प्रसिद्ध असलेल्या गल्ल्या ,ऐतिहासिक वाडे ,स्वतःची ओळख जपलेली भाषा , पाट्या ,शहराच्या ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत विखुरलेली संकेतस्थळ,कॉफी पिण्यापासून ते ऑफिस ची पार्टी अरेंज करण्यासाठी भटकलेली हॉटेल्स हे सगळ आपलंच ..
आणि एके दिवशी इथून निघतो ते थेट सातासमुद्रापार. तिथली बोचरी थंडी ,निष्पर्ण झाडी ,निशब्द रस्ते आपण वेगळ्याच जगात आलो आहोत याची जाणीव घट्ट करत जातात. कोसळणाऱ्या बर्फासोबत संवेदना बधीर करत खिडकीतून डोकावता डोकावता ऋतू पालटतो. छोटी पाने -फुले डोकावू लागतात तसा स्वतःभोवतीचा कोषही निसटू लागतो. संयत पणे जपलेला कोपऱ्या कोपऱ्या वरच्या पार्कस मधला निसर्ग मन निववू लागतो. एखाद्या शांत तळ्याभोवती फिरता फिरता स्वतःशीच संवाद साधत अवघड वाटणारी कोडी सुटू लागतात.लांबलचक पसरलेले रस्ते ,टुमदार घरे , चित्रवत वाटावी अशी निसर्गदृशे ओळखीची वाटू लागतात ..घराचा टेरेस आपल्या नकळत नव्या नव्या फुलझाडांनी भरून जातो. हिवाळा ते उन्हाळा आणि पुन्हा हिवाळा हे ऋतुचक्र नव्याने उलगडू लागतं.हिवाळ्याच्या सुरुवातीला लाल,पिवळी ,नारिंगी होणारी झाडांची पणे शिशिराचा नव्हे तर वसंताची आठवण करून देत अलिप्त पणे गळून जातात तर वसंताची चाहूल लागतातच उमटणारी अगणित रंगांची मैलोनमैल पसरलेली रानफुले वेडावून टाकतात.दिवस  महिने वर्षे पालटतात..आपण आपल्या नव्या विश्वात रंगून जातो
या अशा वर्षांमध्ये आपलं शहरही आपल्याला आठवत असतं पण ते एखाद्या छानश्या चित्रासारखं !
मग एके दिवशी आपण परत येतो, आपल्या आवडत्या शहरामध्ये..आपल्या शहरामध्ये. शहर तेच असतं पण अचानक इथे गर्दी आहे,कुणी ट्राफिक चे नियम पाळत नाहीय, किती खड्डे आहेत ,प्रदूषण किती वाढलंय, रसत्यावरची पाणीपुरी किंवा भेळ खाऊ की नको? , गाडी कुठे पार्क करायची, इथले वन वे किती अवघड आहेत वगैरे प्रश्न पडू लागतात. थोड्या वैतागलेल्या अशा मनस्थिती मध्ये काहीदिवस गेले की सहज भटकायला बाहेर पडावसं वाटू लागत, हळूहळू ओळखीचे रस्ते भेटू लागतात मग रस्त्यात मधेच गाडी थांबवून 'इथे ज्यूस मस्त मिळतो' किंवा इथली मिसळ..आहाहा.' अस काहीबाही आठवायला लागतं. आणि रस्त्यात गाडी थांबवली म्हणून तिकीट लागेल की काय अशी भीती नसते. मागचे लोक थोडा त्रास घेऊन बाजूने जातात. हे सुख मधली काही वर्ष मिस झालेलं असत..
असं जुन्या ओळखीच्या रस्त्यावर भटकल्यावर आपलं शहर पुन्हा नव्याने आपल्याला भेटू लागतं..वरचा चेहरामोहरा थोडासा बदललेला असला तरी जाणवत की 'हे शहर आपलंच आहे !' 








 
Blogger Templates